इंदापूर : इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये घरगुती गॅस टाक्यातून सरासरी दोन किलो गॅस काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात भिगवण पोलिसांनी एका महिला पत्रकाराच्या साहाय्यय्याने यश मिळवले आहे. भिगवण व भिगवण परिसरात इण्डेन गॅस कंपनीच्या अंजली गॅस वितरण एजन्सीमधील कामगारांकडून चक्क घरगुती वापराच्या भरलेल्या टाक्यांमधून गॅसची चोरी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भरलेल्या प्रत्येक गॅसच्या टाकीतून सरासरी २ किलो गॅस काढला जात होता. अखेर या चोरीच गुपित फुटलं असून एका महिला पत्रकाराच्या मदतीने भिगवण पोलिसांनी या गॅस एजन्सीच्या दोघा कामगारांना रंगेहात ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी 47 गॅसच्या टाक्यांसह मिळून एकूण 7 लाख 41 हजार 220 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
भिगवण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकरणी अशोक भवरलाल सिया वय (27 वर्षे )आणि मुकेश कुवरलाल विष्णोई वय 18 वर्षे,( दोघेही रा. मदनवाडी चौक ता. इंदापुर जि. पुणे, मुळ रा. वाडी ता. फालूदी जि. जोधपुर, राजस्थान) यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 41 हजार रुपये किमतीच्या 47 इण्डेन गॅसच्या टाक्या आणि यासोबत गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वापरण्यात येणा-या लोखंडी नळ्या, प्रत्येकी दोन लाख रुपये किमतीची तीन बोलेरो पिक अप वाहने असा एकूण 7 लाख 41 हजार 220 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हे दोघे आरोपी कंपनीचे घरगुती गॅस सिलेंडरमधील ज्वलनशील गॅस हा भरलेल्या 47 सिलेंडरच्या टाकीमधून मोकळ्या सिलेंडरच्या टाकीमध्ये एका लोखंडी पाईपच्या साहय्याने गॅस भरुन चोरी करीत असताना मिळुन आले. त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास भिगवण पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक विनोद महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवालदार लोडी करीत आहेत.