लोणी काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ आणि सुंदर देश करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गाव व परिसर स्वच्छ करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे. वेगवेगळ्या मोहिमा राबवून जनजागृती केली जात आहे. मात्र, कदमवाकवस्तीत (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा कचरा नागरिकांच्या मुळावर अन् जनावरांच्या जीवावर बेतल्यावर उपाययोजना करणार का? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कचरा व्यवस्थापन करण्यास सपशेल अपयशी ठरली आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील ओढ्यालगत कचरा व घाण पडलेली आहे. तर घोरपडे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दुर्गंधीयुक्त कचरा साठलेला आहे. या कचऱ्यात प्लास्टिक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मागील 15 दिवसांपासून या ठिकाणाचा कचरा उचलण्यात आलेला नाही. अथवा या ठिकाणी कचऱ्याची गाडीसुद्धा आली नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे 10 फुट रस्त्यावर हा कचरा साचला आहे. या साठलेल्या कचऱ्यातील अन्नावर गाई, कुत्री व जनावरे ताव मारीत आहेत. मात्र प्लास्टिकयुक्त कचरा असल्याने तो सेवनामुळे जनावरांच्या जीवाला धोका होऊ शकतो. या परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांसह जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने कचरा उचलण्याचे काम एका खाजगी एजन्सीला दिले आहे. परंतु, खाजगी एजन्सीकडून अद्याप काम सुरु न झाल्याची माहिती मिळत आहे. तोपर्यंत ग्रामपंचायत प्रशासाने लक्ष देऊन आरोग्य कर्मचार्यांकडून कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याचा नागरिकांच्या व जनावरांच्या आरोग्यावर नक्की परिणाम होऊ शकतो. तसेच एखादा संसर्गजन्य आजारही पसरण्याची शक्यता? नाकारता येत नाही. त्यामुळे जर एखादी मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कचऱ्याच्या विघटनाचे व्यवस्थापन ग्रामपंचायतीला शक्य?
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतची लोकसंख्या अंदाजे 50 ते 60 हजाराच्या आसपास आहे. गावातील कचरा उचलण्यासाठी काही गाड्या कार्यरत आहेत. मात्र या गाड्यांचा केवळ ग्रामपंचायत केवळ दिखावा केल्याचे समोर येत आहे. तर गावातील सर्व कचरा उचलण्यासाठी आदर पुनावाला स्वच्छ शहर मोहिमेच्या 6 कचरा गाड्या काम करीत आहेत. आणि या कचऱ्याचे योग्य प्रकारे विल्हेवाट लावत आहेत. मात्र कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अथवा कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी कोणतीही यंत्रणा व स्वतंत्र कचरा डेपोही नाही. त्याचबरोबर कचरा प्रक्रिया उद्योग केंद्र उभारण्यासाठी शासकीय जागासुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे कचऱ्याच्या विघटनाचे व्यवस्थापन ग्रामपंचायतीला शक्य होईल का? हेही पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.