डॉ. अशोक बालगुडे

हडपसर: गणेश विसर्जनासाठी नागरिकांची मोठी गर्दी होणार असताना हिंगणे मळा येथील विसर्जन घाटावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. निर्माल्य टाकण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून, नागरिकांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सुरक्षा व्यवस्था अद्याप करण्यात आलेली नसल्याने संभाव्य दुर्घटनेची जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

विसर्जनाच्या वेळी गर्दी वाढल्यानंतर नागरिक धोकादायक भागाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोकादायक ठिकाणी बांबू व अडथळे उभारणे, सूचना फलक लावणे, पुरेशी प्रकाशव्यवस्था करणे आणि किमान दोन सुरक्षा रक्षक तैनात करणे आवश्यक आहे. मात्र, घाटावरील सध्याची अवस्था प्रशासनाच्या पूर्वतयारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

घाट परिसरातील कचरा तातडीने हटवावा, पुरेशा संख्येने निर्माल्य कलश ठेवावेत, निर्माल्याचे नियमित संकलन करून स्वतंत्र विल्हेवाट लावावी, धोकादायक भाग सुरक्षित करावेत आणि विसर्जन काळात नियमित स्वच्छता व देखरेख ठेवावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
२४ तासांत कार्यवाहीची मागणी
नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न असल्याने निवेदन प्राप्त झाल्यापासून २४ तासांच्या आत आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आरु फाऊंडेशनचे नितीन आरु यांच्यासह मयूर फडतरे, गोविंद कुंजीर, हेमंत ढमढेरे आणि अशोक जाधव यांनी हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांकडे निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात स्वच्छता, सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी प्रशासनाची असताना घाटावर कचरा साचलेला दिसणे ही केवळ अस्वच्छतेची बाब नाही; तर उत्सवापूर्वीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रशासनाने त्यापूर्वीच जागे होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.







