मुंबई: आयआयटी बॉम्बेतील विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात आता सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे. 18 सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेशी संबंधित कॅम्पसमधील सुमारे 15 मिनिटांचे फुटेज पोलिसांच्या तपास पथकाने तपासले आहे. या फुटेजमधून परीक्षेच्या हॉलपासून हॉस्टेलपर्यंत साहिलच्या हालचालींची माहिती समोर आली आहे.

यवतमाळचा रहिवासी असलेला 22 वर्षीय साहिल एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. 18 सप्टेंबरला मिड-सेमिस्टर परीक्षा सुरू असताना त्याच्याकडे मोबाइल आढळल्याचे आयआयटी प्रशासनाने सांगितले होते. प्रश्नपत्रिकेचा फोटो घेऊन ChatGPT वर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्याचेही संस्थेने म्हटले होते. परीक्षा पर्यवेक्षक प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांनी त्याला समज दिली होती. त्याच्यावर तत्काळ कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती, असे आयआयटीकडून स्पष्ट करण्यात आले होते.

तपासात समोर आलेल्या फुटेजनुसार, पेपर संपण्याच्या काही मिनिटे आधी साहिल काहीतरी पाहण्यासाठी खाली वाकल्याचे दिसते. त्यानंतर प्राध्यापकांनी त्याच्याशी चर्चा केल्याचे आणि त्याला इतर विद्यार्थ्यांपासून बाजूला नेल्याचे दिसत असल्याची माहिती आहे.

परीक्षा हॉलमधून बाहेर पडल्यानंतर साहिल दुपारी सुमारे 1.25 वाजता हॉस्टेलच्या खोलीत पोहोचला. त्यानंतर तो पुन्हा बाहेर आल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले नसल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नंतर त्याचा मृतदेह खोलीत आढळला.
पवई पोलिसांकडील तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी हॉस्टेलच्या खोलीची झडती घेत पंचनामा केला असून मोबाइल फोन आणि इतर डिजिटल उपकरणे ताब्यात घेतली आहेत. सध्या कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.
दरम्यान, साहिलच्या पालकांनी जातीय भेदभाव, छळ आणि दबावाचे आरोप केले आहेत. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 108 आणि SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहिलच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य केल्याचे सांगण्यात आले असून मानसिक आरोग्य सेवा आणि तक्रार निवारण यंत्रणा सुधारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. प्राध्यापक दुल्ला यांच्याकडील डीनपदाची जबाबदारीही काढून घेण्यात आली आहे. दुसरीकडे, प्राध्यापक संघटनेने त्यांच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







