पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पती बाहेरगावी गेल्यानंतर त्याच्या पत्नीचा खून करुन तिचा मृतदेह घरातील सोफा-कम-बेडच्या बॉक्समध्ये ठेवल्याचा प्रकार उघड झाला आहे. फुरसुंगी येथे ही घटना घडली आहे. स्वप्नाली उमेश पवार (वय २४, रा. हुंडेकर वस्ती, फुरसुंगी) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. स्वप्नाली पवार ही महिला घरी बेडमध्ये बेशुद्धावस्थेत मिळून आल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. नंतर फुरसुंगी बीट मार्शल यांना माहिती कळविण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस अधिकारी विनोद पवार, सहायक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक खंदारे हे दाखल झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नाली पवारचा पती उमेश पवार (वय ३६, रा. लव्हेगाव पो. अकुलगाव, ता. माढा, जि. सोलापूर) याच्याकडे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. उमेश पवार हा उबर टॅक्सीचालक आहे. त्याला बीड जिल्ह्यातील केज येथील भाडे लागल्याने ८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता तो गाडी घेऊन निघून गेला होता. त्याच रात्री तो भाडे सोडून परत आला असता त्याच्या घराला बाहेरुन कडी होती. त्याने दरवाजा उघडून घरात पाहिले तर पत्नी दिसून आली नाही. त्याने मोटारसायकलवरुन परिसरात पत्नीचा शोध सुद्धा घेतला़ पण ती सापडली नाही.
पुढे त्याने घरातील दागिने, पैसे व तिचा मोबाईल पाहिला असता तोही मिळून आला नाही. त्यानंतर त्याने सोफा-कम-बेडमध्ये घरातील दागिने व सोने आहेत का हे पाहण्यासाठी बेड उघडले. तेव्हा त्याला धक्काच बसला. आतमध्ये त्याची पत्नी बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. त्याने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाला होता. घटनास्थळावर पोलिसांच्या डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे.
या घटनेबाबत फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी सांगितले की, महिलेच्या गळ्याजवळ जखमा आहेत. अद्याप शवविच्छेदन झाले नसल्याने तिचा मृत्यु नेमका कसा झाला? हे अद्याप समजू शकले नाही.