शिरूर : ‘हॅलो… नमस्कार, मतदार बंधू भगिनींनो मी तुमचा उमेदवार बोलतोय. या विधानसभा मतदार संघातून उमेदवार म्हणून उभा आहे. या चिन्हावर आपले अमुल्य मत मला देऊन पुढील पाच वर्षासाठी विकास करण्यासाठी संधी मला द्यावी ही विनंती.’ असा आपल्याला फोन आला तर घाबरून जाऊ नका. अशा प्रकारचे रेकॅार्डींग फोन कॅाल करून मतदारांना भुरळ घालण्याचे काम राजकिय पक्षाकडून सुरू झाले आहे. भगीनींना तर लाडक्या बहिणीच्या योजनेची आठवण करून देत निश्तितच फायदा झालाय. तुम्हाला दिवाळी आनंदाची जावो. असे सांगितले जात आहे. त्याबरोबर व्हॅाटसअप मेसेज सुरू झाले असल्याने या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांनी हायटेक प्रचारावर भर दिल्याचे दिसून येत आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणूकीचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्या बरोबर गावोगावी प्रचाराचा नारळ फुटल्याचे दिसून येत आहे. गावातील आठवडे बाजारात सध्या दिवाळीच्या खरेदीची धामधुम सुरू असल्याने प्रचंड गर्दीचा फायदा यावेळी प्रचारात घेतला जात आहे. प्रचाराच्या गाड्यावर कर्णकर्कश भोंगे आणि सोबतच गायन पार्टीची मैफिल पहावयास मिळत आहे. वेगवेगळ्या गितांच्या चालीवर सुरू झालेला प्रचाराला गर्दी होऊ लागली आहे.
एकेक पक्षाच्या गाडी मागे गाडी असा उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे. मागील काळात झालेले सत्तांतर व पक्षांच्या कुरघुड्या यामुळे या विधानसभेत सगळ्याच उमेदवारांना काट्याची ट्क्कर द्यावी लागणार आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत इच्छूकांची गर्दी झालेली पहावयास मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्ष व उमेदवार प्रचारासाठी विविध फंडे वापरत असल्याचे पहावयास मिळत आहे.
शासनाने वेगवेगळ्या घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना आणल्या. त्यातील काही योजनांची अमंलबजावणी झाली. काही योजना मात्र कागदावरच राहिल्याचे दिसून येते. यामध्ये मात्र लाडकी बहिण योजनेची मोठी चर्चा झालेली पहावयास मिळत आहे. योजनांचा लाभ घेताना सादर केलेला मोबाईल क्रमांकावर रेकॅाडींग कॅाल येऊ लागले आहेत. हॅलो, ताई मी तुमचा दादा बोलतोय! लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा झालाय ना. तुम्हाला आर्थिक हातभार लावण्य़ाची संधी आम्हाला मिळाल्याचा आनंद होत असल्याची तोंडभरून कौतूक केले जात आहे. कॅाल, मेसेज, व्हाटसअप मेसेज करून सध्या हायटेक प्रचार करून कमी दिवसात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचे काम नेते मंडळी करू लागले आहेत.
निवडणुक विधानसभेची अन प्रचार जिल्हा परिषद पंचायत समितीचा..
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारांना कमी दिवसात प्रचार करून मतदारांपर्यंत पोहचावे लागणार आहे. त्यासाठी प्रचाराचे वेगवेगळे फंडे राबविले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे हायटेक प्रचाराने देखील वेग घेतला आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छूक उमेदवारांनी आपोआपच प्रचाराला सुरूवात केल्याचे दिसून येत आहे.