अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : रांजणगाव गणपती येथे (दि.२१ )एका महिलेसह एका युवकाला बँकेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तुषार कल्याण काळे याच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव गणपती येथे शुभदा बारसे व शुभम इनामे हे दोघे नोकरी शोधत असताना त्यांची ओळख येथील प्लेसमेंट चालक तुषार काळे याच्यासोबत झाली. दरम्यान तुषार याने शुभदा बारसे व शुभम इनामे या दोघांना बोलावून घेत, शुभदा यांच्याकडून वीस हजार रुपये व शुभम याच्याकडून दहा हजार रुपये तसेच दोघांकडून चेक देखील घेतले.
त्यांनतर दोघांनी वेळोवेळी तुषारकडे नोकरीबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर फोन घेणे सुद्धा बंद केले. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शुभदा तुळशीराम बोरसे (वय ३० वर्षे रा. फाळेगाव ता. बाभूळगाव जि. यवतमाळ) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
फिर्यादीवरून पोलिसांनी तुषार कल्याण काळे (रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित चव्हाण हे करत आहेत.