भोर, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये कोकणात विक्रीसाठी पाठविण्यासाठी शहरात आणलेला सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा साडेचार किलो गांजा भोर पोलिसांनी पकडला आहे. याप्रकरणी गांजा वाहतूक करणा-या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अजय किसन गुमाने (वय २१, रा. अनंतनगर झोपडपट्टी, भोर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी ५ मार्चला रात्री सव्वाआठ वाजता शहरातील महाडनाका परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणात विक्रीसाठी गांजा पाठविण्यात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी महाड नाका परिसरात पाळत ठेवली. रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास महाड नाक्यावरील महाडला जाणा-या रस्त्याच्या डाव्या बाजूला संजयनगर कडे जाणा-या फाट्याजवळील अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसमोर अजय गुमाणे आढळला. त्याच्याजवळील पोत्यात साडेचार किलो उग्र वास असलेला गांजा आढळून आला.
पोलिसांनी त्याला गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलिस हवालदार दत्तात्रेय खेंगरे यांनी फिर्याद दिली असून पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई भोरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव व शिला खोत, पोलीस हवालदार उद्धव गायकवाड, विकास लगस, अविनाश निगडे, गणेश कडाळे, सागर झेंडे व प्रियांका जगताप यांनी केली.