पुणे : पुण्याच्या माजी महापौर रजनी रवींद्र त्रिभुवन यांचे आज (बुधवारी) सकाळी हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज सकाळी त्रिभुवन यांच्या भावाचं निधन झालं होतं म्हणून त्या भावाच्या अंत्यदर्शनासाठी गेल्या होत्या.
भावाच्या निधनाची बातमी ऐकताच त्यांना धक्का बसला. त्यावेळी त्यांना ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. भाऊ आणि बहिणीचे एकाच दिवशी निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
माजी महापौर रजनी त्रिभुवन या 2004 ते 2006 या कालावधीत पुणे महापालिकेच्या महापौर होत्या. त्यांनी महापौर पदाच्या कार्यकाळात शहरातील अनेक समस्या सोडवल्या. त्यावेळी त्यांनी लोकोपयोगी अनेक धाडसी निर्णय घेवून शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागले. झोपडपट्टीतून येणाऱ्या त्या पहिल्या महिला महापौर होत्या. रजनी त्रिभुवन यांनी काँग्रेस पक्षात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या.