संदिप टुले
केडगाव : विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ यायला लागल्या आहेत, तसे महायुतीतील एक एक माजी आमदार आपल्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार विधासभेच्या तयारीला लागल्याचे चित्र पूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. अशातच आता दौंड मध्ये देखील असेच काहीस चित्र आहे.
दौंडमध्ये भाजपचे आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात हे दोन्ही नेते विधानसभेत एकमेकांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. दौंडमध्ये मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले राहुल कुल हे आमदार आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट ) रमेश थोरात यांचा निसटता पराभव केला होता. त्याची पराभवाची सल माजी आमदार रमेश थोरात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना असल्याचे अजूनही बोलले जात आहे. त्याच पराभवाचे उट्टे काढण्यासाठी रमेश थोरात हे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
त्यामुळे महायुतीमध्ये दौंडच्या जागेवरून बिघाडी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जागांवर थेट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीमध्ये समोरासमोर लढत झाल्या होत्या. त्यात दौंडच्याही जागेचा समावेश होता. मागील दोन वर्षापूर्वी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महायुती उदयास आली आणि अनेक नेते, आजी, माजी आमदार हे महायुतीत आले. पण आता तेच नेते आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या आठ दिवसांपासून माजी आमदार रमेश थोरात यांनी बैठकांचा सपाटा लावला असून निवडणूक लढण्याच्या तयारीलाही सुरुवात केली आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दरम्यान, भाजपकडून राहुल कुल यांना उमेदवारी मिळणार, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे रमेश थोरात यांनी अपक्ष किंवा तुतारी हातात घेण्याचे जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे राहुल कुल आणि रमेश थोरात लढत पुन्हा होण्याची चिन्हे दिसून येत आहेत
कार्यकर्त्यांचा ओढा तुतारीकडे
रमेश थोरात यांनी विधानसभेची आगामी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवावी, तसेच ही निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवावी, असा समर्थकांचा अग्रह असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सध्या लोकसभेला दौंडमधून तुतारीला २६ हजारांचे लीड होते. सध्या महाराष्ट्रामध्ये महविकास आघाडीला सहनभूतीची लाट असून याचा थेट फायदा होईल म्हणून कार्यकर्ते तुतारी कडून लढावे असा दबाव टाकत आहेत.