राहुलकुमार अवचट
यवत : उमेद’ अर्थात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून गेल्या १५ दिवसांपासुन वर्धिनींच्या सहकार्याने दौंड पंचायत समिती अंतर्गत यवत येथे जवळपास ५० बचत गटांची स्थापना करण्यात आली असुन यांचा मेळावा यवत येथील पालखी भवन येथे नुकताच संपन्न झाला.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनिता गायकवाड या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या सपना करकंडे व दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना समृद्ध, आत्मसन्मानाचे आणि सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी ‘उमेद’ अंतर्गत एकात्मिक प्रयत्न करण्यात येतात. स्वयंसाहाय्यता गटाद्वारे, बचतगटाद्वारे स्त्रियांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योग व्यवसायाला चालना देण्यात येते.
ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसंघ तर जिल्हा परिषद प्रभाग स्तरावर प्रभागसंघ तयार केले जातात. या संस्थांच्या माध्यमातून गरिबांचे अधिकार, हक्क, वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्यासाठी वातावरण निर्मिती केली जाते.
राज्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समुदाय संसाधन व्यक्तींची एक भक्कम फळी गावपातळीपर्यंत उभी केली जाणार आहे, समुदाय संसाधन व्यक्तीमार्फत गरीब कुटुंबांची नेमकी ओळख करून त्यांना स्वयं सहाय्यता गटात समाविष्ट करण्याचे मोलाचे काम या अभियानांतर्गत केले जाणार आहे.
जिल्ह्यात आणि तालुक्यात जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली असुन हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यस्तरापासून ग्रामस्तरापर्यंत स्वतंत्र मनुष्यबळाची अंमलबजावणी यंत्रणेची निर्मिती करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी केले धनलक्ष्मी, राजलक्ष्मी, शिवनेरी आदि महिला बचतगटांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना सपना करकंडे यांनी यवत परिसरात बचतगट चळवळ प्रभावीपणे चालू असुन महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावे, स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून एकमेकांना सहकार्य करून नवनवीन उद्योजिका पुढे यायला हव्यात, तरच उमेद अभियानाचा उद्देश सफल होईल अशी अपेक्षा व्यक्त करत बचतगट व अभियनाबाबत महिलांना मार्गदर्शन केले.
गटविकास अधिकारी अजिंक्य येळे म्हणाले, आता महिलांनीसुद्धा छोटे-छोटे उद्योग सुरू करून स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. पंचायत समितीकडून बचतगटांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल.
ग्रामपंचायतच्या वतीने बचतगट निर्मितीसाठी सहकार्य केल्याबद्दल पुजा भगत, सुनिता तायडे यांसह वर्धिनीताईंचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, तालुका व्यवस्थापक सचिन आटोळे, ग्रामपंचायत सदस्या मंगल खेडेकर, सुजाता कुदळे, सदस्य नाथदेव दोरगे, माजी पंचायत समिती सदस्या निशा शेंडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या सारिका भुजबळ, शितल दोरगे, संध्या दोरगे, कुमुदिनी अवचट, स्वाती दोरगे यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.