पुणे : पुणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांमुळे आगामी काही दिवस शहराच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे शहराचा कारभार पुढील काही दिवस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत चालवावा लागणार आहे. महापालिकेचे अंदाजपत्रक सुमारे 15 हजार कोटी रुपयांचे आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर हे 5 ऑक्टोबरपासून जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी 2, 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी शासकीय सुट्ट्या आहेत. त्यामुळे या कालावधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपलब्धता मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे हे 12 ऑक्टोबरपर्यंत रजेवर आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर हे 27 सप्टेंबरपासून जपान दौऱ्यावर असून 5 ऑक्टोबरला परतण्याचे नियोजन आहे. अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर या 1 ऑक्टोबरला मुंबईतील बैठकीसाठी जाणार आहेत. त्यामुळे काही दिवस महापालिकेतील महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांवर मर्यादा येऊ शकतात.

विशेष म्हणजे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर हे देखील प्रजीत नायर यांच्यासोबत जपान दौऱ्यावर आहेत. ते 5 ऑक्टोबरपासून पुन्हा पदभार स्वीकारणार आहेत. सामान्य परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत आपत्कालीन नियोजन आणि तांत्रिक कामांमध्ये शहर अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची असते.
याच काळात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू आहे. आयुक्तांनी याबाबत परिपत्रक काढून नवीन कामे, निविदा आणि निधीशी संबंधित कामांबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे एकीकडे आचारसंहितेचे निर्बंध आणि दुसरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, अशा दुहेरी परिस्थितीत महापालिकेच्या निर्णयप्रक्रियेची कसोटी लागणार आहे. शहरात अचानक मोठी घटना किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाचा प्रतिसाद कसा असेल, याकडे आता लक्ष लागले आहे.






