पुणे: गुन्ह्यात अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासह तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शिवाजी ज्योतिराम बनकर (वय ४४, पोलीस हवालदार, नेमणूक शिरूर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण) असे कारवाई करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदाराच्या वडिलांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात १९ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच प्रकरणात मदत करण्यासाठी हवालदार शिवाजी बनकर याने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. या मागणीनुसार तक्रारदाराने यापूर्वी बनकर याला पाच हजार रुपये दिले होते. त्यानंतर उर्वरित दहा हजार रुपयांसाठी बनकर याने तगादा लावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, तक्रारदाराने २९ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने ३० सप्टेंबर रोजी जुने शिरूर पोलीस ठाणे परिसरात सापळा रचला.
सापळ्यादरम्यान पोलीस हवालदार शिवाजी बनकर याने तक्रारदाराकडून ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शिरूर पोलीस ठाण्यात सुरू आहे.








