सागर जगदाळे

भिगवण: दौंड तालुक्यातील खानवटे गावानजीक भिगवण-राशिन मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या सर्विस रोडला काटेरी झाडे-झुडपांचा अक्षरशः विळखा पडला असून, यामुळे सर्विस रोडलगतच्या शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शेतात जाणे-येणे तसेच शेतमालाची वाहतूक करणेही जिकिरीचे झाले आहे.

सर्विस रोडच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढल्याने रस्त्याचा बराचसा भाग झुडपांनी व्यापला आहे. त्यामुळे चारचाकी तसेच दुचाकी वाहने घेऊन शेतात जाणे-येणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. शेतीमालाची वाहतूक करताना वाहनांना झुडपांचा अडथळा निर्माण होत असून, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक शेतकरी व नागरिकांनी केला आहे.

या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत दैनिक लोकनेता प्रतिनिधींनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; मात्र ठोस कार्यवाही करण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
उड्डाणपुलावर लोखंडी सळया; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका
सर्विस रोडची ही अवस्था असतानाच उड्डाणपुलाच्या मुख्य रस्त्यावरही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याच्या वर लोखंडी सळया व अँगल बाहेर आले असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी ही परिस्थिती वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. उड्डाणपुलावरील फूटपाथवरही गवत आणि कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी असलेला फूटपाथ वापरण्यायोग्य राहिला नसल्याचे चित्र आहे.
निकृष्ट कामाचा ठेकेदार कोण? कारवाई कधी?
भिगवण-राशिन मार्गावरील या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असून, वारंवार सळया व चॅनल तुटणे, रस्त्यावर खड्डे पडणे यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून दोष आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे, तसेच कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
कृषिमंत्र्यांकडे तक्रार करणार
उड्डाणपुलाची दुरवस्था, सर्विस रोडवरील काटेरी झुडपे, खड्डे, लोखंडी सळया आणि फूटपाथवरील अस्वच्छता या सर्व प्रश्नांबाबत स्थानिक नागरिक लवकरच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर प्रश्नाकडे कधी लक्ष देणार आणि धोकादायक परिस्थितीची पाहणी करून प्रत्यक्ष कार्यवाही कधी करणार, याकडे खानवटे तसेच परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
उड्डाणपुलाचे काम निकृष्ट; पथदिवेही नाहीत!
भिगवण-राशिन रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप आहे. या ठिकाणी पथदिव्यांची अत्यंत गरज असतानाही आवश्यक प्रकाशव्यवस्था करण्यात आलेली नाही. सर्विस रोडचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले असून, डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर सिलकोट करण्यात आलेला नसतानाही त्याचे बिल अदा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उड्डाणपुलावर सतत सळया व चॅनल तुटत आहेत, रस्त्यावर खड्डे पडत आहेत; मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचा आरोप आहे.
— अशोकराव गायकवाड
माजी सरपंच, खानवटे, ता. दौंड







