अजित जगताप
वडूज : आज सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना संधी मिळाली आहे. त्या संधीचे काही महिला सोने करतात. तर, काही महिला फक्त आरक्षणामुळेच आपल्याला पद मिळाले यातून बाहेर पडत नाहीत. त्यांची हातून फारसं मोठं कार्य होत नाही. परंतु ,एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून कर्तबगार महिला श्रीमती शशिकला देशमुख यांच्या कार्याने समाजातील अनेक लोक आठवण काढत आहेत. आज महिला दिनानिमित्त त्यांच्याशी गप्पा मारताना अनेक नव्या जुन्या आठवणींना उजाळा मिळालेले आहे.
आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीपासून सक्रिय असलेल्या श्रीमती शशिकला देशमुख यांची जडणघडण ही खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली या गावातून झालेली आहे. त्या वेळचे समाजवादी नेते माणिकचंद दोशी यांनी गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. दुष्काळी परिस्थितीमध्ये सार्वजनिक पाणवठ्याचा गाळ काढण्याचा कार्यक्रम केला. यावेळी लहान वयात शशिकला देशमुख यांनी सक्रिय सहभाग घेतला. मुळातच त्यांचे वडील हे स्वातंत्र्यसैनिक सोपानराव बंडोबा देशमुख यांचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले होते. जुनी सातवी असताना त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना सामाजिक कार्य व शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे त्यांनी भूदान चळवळीपासून सुरुवात केली. आज वयाच्या सत्तरी गाठली असली तरी आजही त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असाच आहे .
वाचाल तर वाचाल या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन उच्च पदस्थ केलेले आहे. आजही त्यांच्या घरातील पुस्तकालय पाहिले तर त्यांच्या बुद्धिमत्तेची चुणूक पाहण्यास मिळते. बॅरिस्टर बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, भाई शेट्ये, प्रतापराव भोसले, प्रतापराव जाधव, रामजी पाटील, किसन साबळे- पाटील,शरदचंद्र पवार, अजित पवार, अशा अनेक राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वाटचाल केली.
सातारा जिल्ह्यामध्ये राजकीय प्रवास करताना राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा राजकीय पक्ष मानला जात होता. १९७८ ते १९९२ या कालावधीमध्ये श्रीमती शशिकला देशमुख यांनी सातारा जिल्ह्यातील महिला जिल्हाध्यक्ष म्हणून राष्ट्रीय काँग्रेसची धुरा सांभाळली. त्यावेळी त्यांनी संपूर्ण सातारा जिल्हा हा राष्ट्रीय काँग्रेसमय केला होता. आजही त्यांना असे वाटते की निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांना जर राष्ट्रीय काँग्रेसने संधी दिली तर पुन्हा गत वैभव प्राप्त होऊ शकतो. आज राजकारणामध्ये अनेक बदल झालेले आहेत.
बहुजन समाजाला लागलेली कीड म्हणजे व्यसन होय. हे व्यसन नाहीसे करण्यासाठी त्यांनी दारूबंदीच्या उठाव केला. कुरोली, आनेवाडी, कुडाळ, मेढा, बुध ,वेटणे, निमसोड अशा गावांमध्ये दारूबंदीचा नारा दिला. महिलांचे मतदान घेतले व त्या गावातून दारू हद्दपार केली होती. आजही काही गावात चोरट्या पद्धतीने अनधिकृत दारू मिळत आहे. याचे कारण म्हणजे आज समाजामध्ये नैतिक पतन सुरू झालेले आहे. त्याचीच ही साक्षी आहे. स्वतः पदवीधर असलेल्या श्रीमती शशिकला देशमुख यांनी दोन वेळा म्हाडाचे संचालिका पद तसेच सलग तीस वर्षे सातारा दूध संघाचे संचालिका, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या महिला संचालिका म्हणून त्यांनी १९८१ ते १९८३ या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने काम केले. ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांना शिक्षणासाठी शहरात जायचे असेल तर एस. टी. बसशिवाय पर्याय नाही. याची माहिती घेऊन अनेक गावांमध्ये एस. टी.ची बस सेवा सुरू केली.
ज्या वेळेला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला गरज बसेल त्या वेळेला या वयातही त्यांनी काम करण्याचा संकल्प केलेला आहे. देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांना अटक झाल्यानंतर श्रीमती देशमुख यांनी आंदोलन केले. त्यामुळे त्यांनाही अटक झाली होती. त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत झाले. त्यांच्या घरी स्वतंत्र पुस्तकालय आहे. त्याचे नियमित ते वाचन करतात. अशा या श्रीमती शशिकला देशमुख यांना महिला दिनानिमित्त दीर्घ आयुष्य लाभो, यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय सदस्य रणजीतसिंह देशमुख, माण खटाव विधानसभा अध्यक्ष डॅा. महेश गुरव, सत्यवान कांबळे, राहुल सजगणे, डॉ संतोष देशमुख, इम्रान बागवान, विजय शेटे, राजू फडतरे, अजित कंठे, परेश जाधव, दिपक गोडसे, स्वप्नाली गोडसे, आरती काळे, राधिका गोडसे, रुक्मिणी जाधव, सुरेखा घाडगे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.