शिरूर : सुनेचे सासऱ्या बरोबर प्रांपंचिक वाद झाले होते. या वादानंतर सुनेचे दोन भाऊ आणि एक बहीण यांनी सासऱ्याला केलेल्या जबर मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना शिरूर येथील होलमिल बेकरी जवळच्या डांबरी रोडवर १ ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली होती. वसंत दिलीप भोसले (वय ४३, रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिरुर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मृत वसंत भोसले आणि त्यांची सुन अंजली रुवल काळे हिच्या सोबत प्रापंचिक वाद झाले होते. या वादाच्या कारणावरून सुनेचे दोन भाऊ नागरेष बाजीराव काळे, राजेश बाजीराव काळे आणि एक बहीण निधु बाजीराव काळे (सर्व रा. पाण्याची टाकी जवळ, शिरूर) यांनी कोयता उलटा करून बोथट बाजू कडून कोयत्याने छातीत, पायावर मारून डांबरी रोडने फरपटत नेऊन जबर मारहाण केली होती. या मारहाणीत वसंत भोसले यांचा ५ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी तिन्ही आरोपींवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्हा घडल्यापासून आरोपी नागरेष बाजीराव काळे हा फरार होता.
दरम्यान, फरार आरोपी हा चाफेकर चौक चिंचवड येथे येणार असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार विजय शिंदे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे विजय शिंदे यांनी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना कळवले. त्यानंतर त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला आदेश दिले. त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सपोनि हणमंतराव गिरी यांचे पथकामधील पोलीस अंमलदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार विजय शिंदे, निलेश थोरात यांनी चाफेकर चौक चिंचवड येथे जावुन सापळा लावून शिताफिने आरोपीला पकडून ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे याचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोसई दिलीप पवार यांचे पोलीस पथकाने केली आहे.