संतोष पवार
इंदापूर : खडकवासला धरण साखळीतील पाणी इंदापूर तालुक्यातील टेल भागातील शेतीसिंचनासाठी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. इंदापूरच्या सिंचनासाठी हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उजनीतून उपसा सिंचन योजना राबविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दि २३ रोजी पुण्यातील सिंचन भवनासमोर शेतकरी लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती खडकवासला कालवा पाणी संघर्ष कृती समितीने दिली आहे.
याबाबतचे निवेदन कृती समितीने कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, पुणे पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता, जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांना दिलेले आहे. खडकवासला कालव्याच्या पाण्याची नसलेली शाश्वती आणि मिळणाऱ्या आर्वतनाची अनियमितता यामुळे इंदापूर तालुक्यातील शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. पुणे शहराची वाढती मागणी, जानाई शिरसाई योजनेसाठी केलेल्या तरतुदी यामुळे खडकवासला कालव्यावर अवलंबून असलेली १९ गावे, सणसर कटच्या माध्यमातून निरा डावा कालव्यावरील इंदापूर तालुक्यातील पाणी मिळणारी २२ गावे अशा ४१ गावातील शेतीसिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
खडकवासला धरणाच्या मूळ प्रकल्प आराखड्यातील मंजूर पाणी कोटा गेल्या कित्येक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचा आरोप होत आहे. धरणातील पाणी वाटप झालेले असताना वाढीव पाण्याच्या योजना अस्तित्वात आणल्या जात आहेत. यात मूळ आराखड्यात समाविष्ट असलेल्या इंदापूरकरांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारला जात आहे. यामुळे इंदापूरकरांना पुण्याने वापरलेले व भीमा नदीत वर्षभर येत असलेले सांडपाणी प्रक्रिया करून शेतीला देण्यासाठी उजनीतून उपसा सिंचन योजनेची मागणी शेतकरी करीत आहेत…