गणेश सुळ
केडगाव : दौंड तालुक्यातील अनेक भागात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या शेत पिकांच्या नुकसानीला हानिकारक हा पाऊस असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. या अवकाळी पावसाने भाज्यांच्या मळ्यात हातातोंडाशी आलेला भाजीपाला , फळबागा, जनावराचा चारा पाण्यात भिजून मातीमोल झाला आहे, तर गारपिटीने उभी पिके भुईसपाट झाली.
यामध्ये दौंड तालुक्यातील यवत, केडगाव, वरवंड, पाटस, कुरकुंभ, मळद, मलठण, देऊळगाव राजे, बोरीबेल, अशा अनेक भागातील शेतकरी वर्गावर आभाळ कोसळले आहे. सध्या दुपारनंतर ढगाळ वातावरण होत असून अनेक ठिकाणी रिमझिम तर अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याचे चित्र दौंड तालुक्यात आहे.
दरम्यान, तालुक्यात नुकतेच साखर कारखाने सुरू झाल्याने ऊसतोड सुरू आहे. परंतु शेत पिकात पाणी साचून चिखल झाल्याने अंतर्गत रस्ते चिखलमय झाले. त्यामुळे ऊस वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे बाजार दर वाढल्याने वखारीतून कांदा बाहेर काढला, पण पावसाच्या वातावरणामुळे त्यांना पुन्हा कांदा वखारीत टाकण्यासाठी कसरत करावी लागली. पावसाळ्यात हुलकावणी दिलेल्या पावसाने हिवाळ्यात हजेरी लावल्याने हा पाऊस शेतीसाठी नुकसानकारक ठरणार असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.