शिरूर, ता. १० : शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथे शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये संघर्ष उफाळून आला असून, चुलत भावाने मिरचीपूड फेकून दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात शेतकरी, त्यांची पत्नी आणि वडील जखमी झाले असून, उपचारासाठी जात असतानाही काही जणांनी रुग्णालयाबाहेर धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी ज्ञानेश्वर संपत गायकवाड (वय ४०, व्यवसाय शेती, रा. निमगाव दुडे, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, नितीन बाळासाहेब गायकवाड, मालती बाळासाहेब गायकवाड, राहुल घोडे आणि शिवाजी घोडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सुमारे महिनाभरापूर्वी गावातील सोनवणे कुटुंबीयांकडून २५ गुंठे शेतजमीन खरेदी केली होती. ६ जून रोजी सायंकाळी ते पत्नी स्वाती गायकवाड आणि वडील संपत गायकवाड यांच्यासह नव्याने खरेदी केलेल्या शेतात काम करत होते.
यावेळी त्यांचा चुलत भाऊ नितीन गायकवाड तेथे आला आणि “तुम्ही माझ्या आईला मारहाण का केली?” असा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. फिर्यादीने हा आरोप फेटाळून लावत शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या नितीन गायकवाडने खिशातून मिरचीपूड काढून ती थेट फिर्यादीच्या डोळ्यात फेकल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर त्याने शर्टामध्ये लपवून आणलेले लाकडी दांडके बाहेर काढून ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या डोक्यावर, हातावर, खांद्यावर आणि पाठीवर मारहाण केली. या हल्ल्यात त्यांची पत्नी स्वाती गायकवाड आणि वडील संपत गायकवाड यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर “पुन्हा आमच्या नादी लागलास तर गावातील इतर लोकांना घेऊन तुझा कार्यक्रमच करतो,” अशी धमकी देण्यात आली. आरडाओरडा ऐकून शेजारील शेतातील नागरिक घटनास्थळी धावून आल्याने जखमींची सुटका झाली.
दरम्यान, काही वेळाने नितीन गायकवाड यांची आई मालती गायकवाड घटनास्थळी आली आणि “तुम्हा दोघांना आयुष्यभर जेलमध्ये पाठवीन,” अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. विशेष म्हणजे, जखमी कुटुंबीय उपचारासाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयात जात असताना रुग्णालयाबाहेर राहुल घोडे आणि शिवाजी घोडे यांनी पुन्हा गाठून “नीट रहा, नाहीतर तुझा कार्यक्रम करण्यात येईल,” अशी धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
जखमींना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र प्रकृती बिघडल्याने ज्ञानेश्वर गायकवाड आणि त्यांची पत्नी यांनी शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार सुरू केले आहेत. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.







