जुन्नर : उत्पन्नाचे बनावट दाखले देणाऱ्याविरुद्ध जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या दुकानातील इतर व्यक्तींचे दाखले तसेच बनावट दाखले बनविण्यास लागणारे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर येथील शंकरपुरा पेठेतील रामकृष्ण हरी लॉटरी सेंटर येथे बनावट दस्तऐवज तयार करत आहेत. अशी माहिती महसूल विभागाचे निरीक्षण अधिकारी ज्ञानेश कुलकर्णी व पुरवठा निरीक्षक दीपक मडके यांना गुरुवारी (दि. ९) रोजी सायंकाळी मिळाली. त्यानंतर कुलकर्णी यांनी शुक्रवारी (दि. १०) तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांच्या आदेशानुसार जुन्नर पोलिसांना माहिती दिली आहे.
दरम्यान, त्यानंतर निरीक्षण अधिकारी ज्ञानेश कुलकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक एस. के. मोरे व पुरवठा निरीक्षक दीपक मडके दोन साक्षीदार यांच्यासह रामकृष्ण लॉटरी सेंटर शंकरपुरा पेठ जुन्नर येथे आले. त्यावेळी तेथे आरोपी विनोद बिडवई हा बनावट उत्पन्नाचे दाखले देत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच त्याच्या दुकानातील अन्य व्यक्तींचे दाखले व बनावट दाखले बनविण्यास लागणारे कॉम्प्युटर, प्रिंटर, सीपीयू असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.