दौंड : दौंडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात पोलिस दलातील चालक असल्याची बतावणी करून वावरत असणाऱ्या एका तोतया पोलिसाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तोतया पोलिसाने प्रशिक्षण केंद्राचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याने त्याच्या हेतूची चौकशी करण्यात येत आहे.
याबाबत, अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी याबाबत माहिती दिली. जय राजेंद्र यादव (वय-२५, रा. विर्शी, ता. भातकुली, जि. अमरावती) या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी जय यादव या तरूणाने नानवीज येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावर पोलिस दलात चालक असल्याचे सांगत प्रवेश मिळविला. राज्य पोलिस दलाचे बोधचिन्ह असलेले शारीरिक प्रशिक्षणाचे टी शर्ट व पॅण्ट अशी वेशभूषा करीत त्याने केंद्रामधेय प्रवेश मिळवला.
जय यादव याने त्याच्याकडील मोबाइल संचात प्रशिक्षण केंद्राच्या आवारातील इमारती, कार्यालये व मैदानाचे छायाचिक्षण करीत व्हिडिओ चित्रण सुद्धा केल्याची माहिती समोर येत आहे. राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या आत व्हिडिओ चित्रण सुरू असल्याने व जय यादव याचे वर्तन संशयास्पद असल्याचे आढळून आल्याने कर्तव्यावरील अंमलदारांनी त्याला थांबवून टायची विचारणा करण्यात आली.
चौकशी करत असताना त्याने अमरावती जिल्हा पोलिस दलात चालक असल्याची बतावणी केली. तसेच नानवीज येथे एका वर्षापूर्वी चालकाचे प्रशिक्षण घेतल्याचा त्याच्याकडून दावा करण्यात आला. त्याने राज्य राखीव पोलिस दलाचे हुबेहुब ओळखपत्र तयार करून घेतले होते, परंतु त्यावर कोणत्याही वरिष्ठ अधिकार्याची स्वाक्षरी व हुद्दा नमूद करण्यात आला नसल्याचे दिसून आले.
दौंड पोलिस ठाण्यात राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रातील उप निरीक्षक दत्तू शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार जय यादव याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या अंगझडतीत जय यादव याच्याकडे पोलिस पेहरावातील टोपी, शारीरिक प्रशिक्षण व कवायतीचे बूट, कंबरपट्टा हे साहित्य आढळून आले. पुढील तपास दौंड पोलिस करत आहेत.