इंदापूर : इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी प्रवीण माने यांच्या परिवर्तन विकास आघाडीमध्ये बिनाशर्त प्रवेश केला. मयूरसिंह पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसलेला आहे. हर्षवर्धन पाटील यांना मयूरसिंह पाटील यांच्या प्रवेशाने घरचाच आहेर मिळाला आहे. या पक्षप्रवेशाने ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसलेला आहे.
इंदापूर येथील सोनई पॅलेसमध्ये पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. त्यावेळी बाजार समितीचे माजी सभापती, दूधगंगा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष मयूरसिंह पाटील यांनी परिवर्तन विकास आघाडी मध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या वेळी सोनाईचे सर्वेसर्वा दशरथ माने, परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण माने, बाबासाहेब चवरे, राजेश जामदार, समद सय्यद, दादा थोरात, विकास खिलारे, अनिल ढावरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मयूरसिंह पाटील म्हणाले, मी ज्या कुटुंबातून आलेलो आहे. त्याच कुटुंबातून हर्षवर्धन पाटील आलेले आहेत. माझे चुलते कर्मयोगी शंकरराव पाटील यांनी राजकीय वारस म्हणून हर्षवर्धन पाटील यांना तालुक्याचे प्रतिनिधित्व दिले. 1995 ला जेव्हा बंडखोरी झाली त्यावेळी दशरथ माने त्यांच्यासोबत होते. शंकरराव पाटील यांच्या पश्चात हर्षवर्धन पाटील यांनी एकाधिकारशाही राबवली. मी जरी अनेक संस्थाचे प्रमुख म्हणून काम करत होतो. परंतु, मला सुद्धा त्यांना विचारल्याशिवाय कोणतेही काम करता येत नव्हते असा गोप्यस्पोर्ट त्यांनी यावेळी केला.
मयूरसिंह पाटील पुढे म्हणाले, मी बावडा ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून प्रथमतः निवडून आलो. त्यानंतर अनेक संस्थांचा प्रमुख म्हणून कारभार पाहिला. मात्र हर्षवर्धन पाटील हे थेट आमदार झाले, त्यानंतर मंत्री झाले अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे असे सांगून पाटील पुढे म्हणाले, दत्तात्रय भरणे हे सुद्धा सुरुवातीच्या काळात जनतेचे सेवक म्हणून काम करत होते. मागील पंचवार्षिक मध्ये ते मंत्री झाले. त्यानंतर त्यांच्या वागण्या बोलण्यात फरक झाला. हे सर्व पाहून आम्हाला सुद्धा आत्मसन्मानासाठी, स्वाभिमानासाठी अपक्ष उमेदवाराची साथ देणे गरजेचे वाटले असे पाटील यांनी सांगितले.