पुणे : पुण्यातील तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यतील पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गेले दोन दिवस शनिवार आणि रविवारी तहसील कार्यालयाला सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयात अधिकारी आले असता त्यांना स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडण्यात आलेल आढळून आलं. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरी गेल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिट चोरी गेले ही अत्यंत धक्कादायक बाब असून यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.