पुरंदर : पुरंदर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना एका छताखाली आणून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राजे छत्रपती क्रांती संघटनेची स्थापना पुरंदर तालुक्यात करण्यात आली आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश जगताप यांनी दिली आहे. आंबळे (ता. पुरंदर)येथे नुकताच संघटना स्थापनेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संघटनेचे अध्यक्षपदी संतोष कुंभारकर, कार्याध्यक्ष पदी नंदू गायकवाड, उपाध्यक्षपदी निलेश कुदळे, आणि चांगदेव कुंजीर, मार्गदर्शक म्हणून तुषार माहूरकर आणि मधुकाका खेडेकर, कायदेशीर सल्लागार म्हणून विष्णू पिलाने, तर संघटक पदी नितीन शेंडकर यांची निवड करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश जगताप म्हणाले कि, पुरंदर तालुक्यात जेजुरी परिसरात एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या आहेत, मात्र त्या कंपन्यांमध्ये बहुतेक कामगार वर्ग हा परप्रांतीय आहे. स्थानिक कामगारांची संख्या खूप कमी आहे. तालुक्यात कंपन्या असताना प्राधान्य मात्र परप्रांतीय लोकांना दिले जात आहे. आगामी काळात एमआयडीसीचा विस्तार वाढणार असून, मोठमोठे उद्योग व्यवसाय तालुक्यात येणार आहेत. त्या दृष्टीने तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार युवकांना संघटित करून त्यांचा रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरे भरवून शाळा कॉलेजमध्ये मार्गदर्शन करण्यात येईल, असेही गणेश जगताप यांनी प्रतिनिधीला माहिती दिली.