शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे ईकॉम एक्सप्रेस कुरिअर कंपनीच्या कामगाराने पार्सलमधून आलेल्या महागड्या मोबाईलचा अपहार केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी किरण नामदेव नरवडे (वय-३० रा. खंडाळे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी लक्ष्मण विश्वनाथ लोंढे (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. होळकर नगर, जि. परभणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कुरिअर कंपनीच्या कामगाराकडे दिवसभरात ग्राहकांना देण्यासाठी काही महागड्या वस्तूंचे पार्सल दिले होते. त्यांनतर एका ४३ हजार रुपये किमतीच्या मोबाईलचे पार्सल ग्राहकाला मिळालेले नाही असे कंपनीचे व्यवस्थापक किरण नरवडे यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी पार्सल विषयी चौकशी केली असता कामगार लक्ष्मण याने अपहार केल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढील तपास पोलीस हवालदार वैभव मोरे करीत आहेत.