दीपक खिलारे
इंदापूर : शहरातील अवैध कत्तलखान्यांवर बुलडोझर फिरवून जमिनदोस्त करण्याची मागणी मानद पशुकल्याण अधिकारी महा.शासन शिवशंकर स्वामी यांनी निवेदनाद्वारे इंदापूर नगरपरिषद व इंदापूर तहसिलदार यांच्याकडे केली आहे.
इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील कसाई गल्लीतील अवैध कत्तलखान्यांवर दि.२३ नोव्हेंबर २०२२ रोजी धाडसी कारवाई केली होती. या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले होते. तसेच नगरपरिषदेचे कौतुक केले होते. त्यानंतर दि. २० जानेवारी २०२३ व दि. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी इंदापूर पोलीसांकडून टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले होते.
या दोन्ही वेळेस इंदापूर पोलीसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच दि. २० जानेवारी २०२३ रोजी इंदापूर शहरातील कत्तलखान्यातून गोमांस घेऊन जाणाऱ्या स्कोडा कारवरती भिगवण पोलिसांनी कारवाई केली होती. वरील घटनेवरून नगरपरिषदेने जमिनदोस्त केलेल्या तसेच काही तांत्रिक कारणामुळे कारवाईपासून वंचित राहिलेल्या अवैध कत्तलखान्यांतून आजमितीस गायींच्या कत्तली होत असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे नागरिकांना कर्करोगासारखा भयानक आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने शहरातील अवैधरित्या सुरु असलेल्या कत्तलखान्यांवर बुलडोझर फिरवून जमिनदोस्त करावेत अशी मागणी शिवशंकर स्वामी यांनी आपल्या निवेदनात केली आहे.