लोणी काळभोर : तुम्हाला मायेची ऊब हवी तर मग आईच्या नावे प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष लावावा आणि त्याला जगवावे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी केंद्र शासनाने १४० कोटी जनतेच्या खांद्यावर १४० कोटी वृक्ष लागवडीची जबाबदारी सोपवली आहे. विद्यार्थ्यांनी ‘एक पेड मेरे माॅं के नाम’ ही संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे. आईच्या नावाने लावलेले झाड भविष्यात मुलांना नक्कीच सुखाची सावली देईल यात दुमत नाही असे मत पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांनी व्यक्त केले.
लोणी काळभोर (ता.हवेली) पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये ‘हरितसेना संलग्न निसर्ग साधना मंडळातील’शालेय विद्यार्थ्यांनी ‘एक पेड माँ के नाम’ महावृक्ष लागवड अभियानाला सुरुवात केली. यावेळी सीताराम गवळी बोलत होते. नैसर्गिक संसाधने आणि त्यांचा वापर, त्याचबरोबर झालेली वृक्षतोड व त्यांचा दुष्परिणाम या सर्व बाबींचा विचार करून सदर मोहीम सुरू केली. यावेळी विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना संलग्न निसर्ग साधना मंडळाचे सर्व स्वयंसेवक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राजेश चौरे, सुरेश कोरे, सातगोंडा कांबळे व सर्व शिक्षकवृंद यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी लोणी गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात वृक्षदिंडी काढून ‘झाडे लावा झाडे जगवा’ व ‘एक पेड माँ के नाम’ नारे देत वृक्षदिंडी काढली. यावेळी नागरिकांना झाडे लावा झाडे जगवाचा संदेश दिला. विद्यालयात शिसम, आपटा, करंज, बकुळ या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तीर्थक्षेत्र रामदरा परिसरातील माळरानावर पहिल्या टप्प्यात २५० वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार करण्यात आला. या अभियानामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे विद्यालयाच्या हरितसेनेच्या प्रमुख शिक्षिका शर्मिला साळुंखे यांनी सर्वांचे आभार मानले.