संतोष पवार
पुणे : सत्तावीस वर्ष ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून, पोपट बनकर यांनी संस्कारक्षम पिढी घडवण्याचे केलेले कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. राधिका रेसिडेन्सी इंदापूर येथे संपन्न झालेल्या सेवापूर्ती गौरव समारंभात ते बोलत होते. मूळचे बनकरवाडी(इंदापूर )येथील पोपट बनकर सर यांनी श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित, श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा येथे सहशिक्षक आणि पर्यवेक्षकपदी सेवा करीत असताना, सत्तावीस वर्ष अध्यापनाचे काम केले.
गणित विषयाचे प्रभावी अध्यापन, शालांत परीक्षांचे उत्तम नियोजन आदि कामांमुळे त्यांना २०२२ साली पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला. सेवापूर्ती सोहळ्यात पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, बनकर यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने आपली सेवा करण्याचे काम केले . बनकर कुटुंबीय एक आदर्श व एकत्रित कुटुंबव्यवस्थेचे प्रतिक असुन त्यांची मुले बंधु सर्व उच्च शिक्षित आणि उत्तम ठिकाणी शासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांचे सेवानिवृत्ती नंतरचे जीवन आरोग्यदायी आणि आनंददायी जावो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडाचे सचिव किरण पाटील, संचालक प्रसाद पाटील, शहाजीराव पाटील, विकास प्रतिष्ठान वनगळीच्या सचिव भाग्यश्री पाटील, इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड मनोहर चौधरी, कर्मयोगी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन माऊली बनकर,प्रा. सुरेश बनकर प्राचार्य गोरे सर, कोकाटे सर आदि मान्यवर उपस्थित होते.