लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर व परिसरात रविवारी (ता. २६) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे रस्त्याच्या कडेला भाजी व फळे विक्री करणारे विक्रेते व ग्राहकांची त्रेधातिरपीट उडाली. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ पाऊस कोसळत होता. पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साठले होते. तसेच वातावरणात गारवा निर्माण झाला.
लोणी काळभोर, उरुळी कांचन, सोरतापवाडीसह परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या तरकारी पिकाचे तसेच इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासूनच ढगाळ वातावरण होते. पाऊस पडण्याची शक्यता हवामान खाते वर्तवित होते. त्याचा प्रत्यय रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आला.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कांदा काढणी तसेच तरकारी पिके काढणे सुरू आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत सापडला आहे.