हडपसर, ता. २८ : पुणे–सोलापूर महामार्गावरील मांजरी फार्म परिसरात उभ्या असलेल्या आयशर टेम्पोचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १५ लाख ६८ हजार किमतीचे गारमेंट्स आणि कॉस्मेटिक साहित्य लंपास केल्याची धक्कादायक घटना २३ जुलै रोजी मध्यरात्री घडली आहे. विशेष म्हणजे, चालक गाडीत झोपलेला असतानाच चोरट्यांनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी चालक दस्तगीर अमनसाब नसलापुरी (वय ६०, रा. हुक्केरी, जि. बेळगाव, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मांजरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील सानपाडा येथून एमएच-०१-ईई-७३०० क्रमांकाच्या आयशर टेम्पोमध्ये गारमेंट्स आणि कॉस्मेटिक साहित्य भरून चालक दस्तगीर नसलापुरी हे हैदराबादकडे निघाले होते. पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी मांजरी फार्म, द्राक्ष संशोधन केंद्राजवळ पुणे–सोलापूर महामार्गालगत वाहन उभे करून विश्रांतीसाठी गाडीतच झोप घेतली.

२४ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते पुढील प्रवासाला निघाले. दुसऱ्या दिवशी हैदराबाद येथे माल उतरवण्यासाठी टेम्पोचे मागील लॉक उघडण्याचा प्रयत्न केला असता लॉक गायब असल्याचे दिसून आले. दरवाजा उघडून पाहिल्यानंतर अनेक पार्सल बॉक्स चोरीला गेल्याचे तसेच काही बॉक्स फाटलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वाहनमालकाला माहिती देण्यात आली.
दरम्यान, मांजरी परिसरात चालक झोपेत असताना अज्ञात चोरट्याने टेम्पोचे मागील लॉक तोडून आत प्रवेश करत गारमेंट्स, नाईटी, शर्ट, जीन्स, लेडीज वेअर, कुर्ते, रेडीमेड कपडे तसेच कॉस्मेटिक साहित्य असलेले एकूण १५ बॉक्स, अंदाजे १५ लाख ६८ हजार ८३४ रुपये किमतीचा माल चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, महामार्गावरील हालचाली आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. महामार्गावर मालवाहू वाहने उभी करून चालक विश्रांती घेत असताना अशा प्रकारच्या चोरीच्या घटना पुन्हा समोर आल्याने मालवाहतूक व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.






