मुंबई : देशसेवा करून परतलेल्या अग्निवीरांसाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील २८२ माजी नौदल अग्निवीरांना पोलीस शिपाई म्हणून नियुक्ती देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः समाजमाध्यमांवरून याबाबत माहिती दिली. या निर्णयामुळे नौदलातील सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना आता महाराष्ट्राच्या पोलीस दलात काम करण्याची संधी मिळणार आहे.

अग्निवीरांना शासकीय नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार आवश्यक नियमांमध्ये बदल करून २८२ माजी नौदल अग्निवीरांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या नियुक्त्यांसाठी थेट आदेश देण्यात येणार असून, त्यांना पुन्हा भरती प्रक्रिया किंवा शारीरिक चाचणी द्यावी लागणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

अग्निवीरांची यापूर्वीच निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणाचा आणि अनुभवाचा उपयोग पोलीस दलासाठी होऊ शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे. अग्निवीरांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र पोलीस दलात काम करण्याची इच्छा असल्यास सामावून घेण्याची भूमिका राज्य सरकारने यापूर्वीच स्पष्ट केली होती.

या निर्णयामुळे विशेषतः सागरी सुरक्षेसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा लाभला असून, किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज असते. नौदलात सेवा बजावलेल्या अग्निवीरांचा अनुभव पोलीस दलासाठी उपयुक्त ठरू शकतो. या नियुक्त्यांमुळे सागरी सुरक्षेच्या कामकाजाला बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माहितीनुसार, नौदलातील पहिल्या बॅचमधील माजी अग्निवीरांना सामावून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. थेट नियुक्तीचा निर्णय हा अग्निवीरांना देशसेवेनंतर रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा भाग आहे.
या निर्णयामुळे संरक्षण दलातील सेवा पूर्ण केलेल्या तरुणांना राज्याच्या सुरक्षा यंत्रणेत काम करण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. आगामी काळात अग्निवीरांच्या अनुभवाचा वापर पोलीस दलातील इतर सुरक्षा कामांसाठी कसा केला जातो, याकडे लक्ष लागले आहे.







