पुणे: ‘दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी’च्या संचालकपदी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या 13 संचालकांपैकी एक पद निवृत्तीमुळे रिक्त झाले होते. त्यासाठी अध्यासी अधिकारी सुभाष काळे यांच्या अध्यक्षतेखाली 23 ऑक्टोबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये महेश गायकवाड यांचा एकमेव अर्ज वैध ठरल्याने सर्वसाधारण गटातून त्यांची निवड जाहीर करण्यात आली.

या निवडणूक प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अनिल भोंग, उपाध्यक्ष सुमित कदम, सचिव जमीर तांबोळी, खजिनदार दिनेश गडांकुश यांच्यासह सागर घोरपडे, आकाश फासगे, शशिकांत नरुटे, गणपत गोरे, राजेंद्र मारणे, पितांबर गंबरे, अनिल गावडे, वैशाली गोडगे आणि आशा राठोड हे संचालक उपस्थित होते.

महेश गायकवाड सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलांतर्गत दहशतवाद विरोधी पथाकात (ATS) कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल येथे उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या सेवेबद्दल त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. गायकवाड यांचा प्रशासकीय अनुभव आणि पोलीस कर्मचाऱ्यांबद्दलची आत्मीयता लक्षात घेऊन ही निवड करण्यात आल्याचे अध्यक्ष अनिल भोंग यांनी सांगितले.

स्वातंत्र्यपूर्व काळात, म्हणजेच 20 जून 1920 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेचे आज पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, CID, ATS आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे 15,193 सदस्य आहेत. संस्थेचे भागभांडवल 330 कोटी रुपये असून वार्षिक उलाढाल 3200 कोटी रुपये इतकी आहे. संस्थेला सातत्याने ‘अ’ वर्ग ऑडिट दर्जा मिळाला आहे. तसेच ही संस्था आपल्या सभासदांसाठी 20 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 3 लाख रुपयांपर्यंतची कॅशलेस वैद्यकीय विमा योजना राबवते.
आपल्या निवडीनंतर बोलताना महेश गायकवाड यांनी, संस्थेची पत वाढवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी पारदर्शक आणि गतिमान काम करण्याचा शब्द दिला.






