बारामती : बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. व्हीव्हीआयपी किंवा मंत्र्यांसारखे तगडे पोलिस संरक्षण मिळावे, यासाठी सूर्यवंशी यांनी स्वतःच हा जीवघेणा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. या खळबळजनक प्रकरणाने पुणे जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे 18 ऑक्टोबरला संध्याकाळी ही घटना घडली होती. राणा सूर्यवंशी कामासाठी गेले असताना त्यांच्यावर शस्त्राने उजव्या हातावर वार झाले होते, ज्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या वाहनचालकाने दिलेल्या तक्रारीवरून बारामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पार्थ अवथडे, स्वप्नील कांबळे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू आहे.

तपासादरम्यान समोर आले की, सूर्यवंशी यांना यापूर्वी पैशांच्या बदल्यात पोलिस सुरक्षा मिळाली होती. मात्र मंत्र्यांसारखा ताफा आणि एस्कॉर्टसह व्हीव्हीआयपी दर्जाचे संरक्षण मिळवण्याची त्यांची इच्छा होती. या हव्यासापोटीच हा बनाव रचण्यात आला होता. दरम्यान, या सुरक्षा ताफ्यात तीन ते चार जिल्ह्यांतील पोलिस असल्याचे उघडकीस आल्याने पोलिस महासंचालक कार्यालयात खळबळ उडाली.

महासंचालक सदानंद दाते यांनी संबंधित युनिट कमांडरना चांगलेच धारेवर धरले असून, अतिरिक्त पोलिस महासंचालक निखिल गुप्ता यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.






