नांदेड : मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील एका 40 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचा गळफास लावून घेतलेला मृतदेह खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आढळल्याने खळबळ उडाली. चंद्रकांत शिंदे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत शिंदे यांनी एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. कर्जाचे काही हप्ते थकल्यामुळे फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांना थेट त्यांच्या गावातून बळजबरीने नांदेड शहरातील हिंगोली गेट ते चिखलवाडी बायपास रोडवरील कार्यालयात आणले होते.

कार्यालयात आणल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर कर्जाच्या वसुलीसाठी प्रचंड मानसिक दबाव टाकला. या सततच्या दबावाला कंटाळूनच चंद्रकांत यांनी कार्यालयातच टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, अचानक त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली.

माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि पुढील शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. चंद्रकांत शिंदे यांनी नैराण्यातून आत्महत्या केली की यामागे काही घातपात आहे, याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. दोषी फायनान्स कर्मचाऱ्यांवर व पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे.






