अक्षय टेमगिरे

शिरूर : लाखाच्या गुंतवणुकीवर दरमहा 8 ते 10 टक्के परताव्याचे आमिष दाखवून हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सिस-पे (CIS Pay) घोटाळा प्रकरणात एक मोठा टप्पा समोर आला आहे. तळेगाव ढमढेरे येथील तलाठी दशरथ विठ्ठल रोडे यांना अहिल्यानगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने श्रीगोंदा येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, महसूल यंत्रणेतील एका कर्मचाऱ्याच्या या अटकेमुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ जाळ

सिस-पे, इन्फिनिटी, बिकन आणि ग्लोबल ट्रेडिंग यांसारख्या कंपन्यांच्या नावाखाली हा सर्व प्रकार सुरू होता. सुरुवातीला काही लोकांना वेळेवर परतावा देऊन लोकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर अल्पावधीतच हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आले. कर्जत तालुक्यातील मांदळी येथील रहिवासी नितीन गांगर्डे यांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. या प्रकरणात कंपनीचे चालक, एजंट आणि इतर साथीदारांसह एकूण 98 लोकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

परदेशात पळालेल्या सूत्रधाराला आणले भारतात
या घोटाळ्यातील मुख्य आरोपी राहुल काळोखे हा परदेशात पळून गेला होता. मात्र, महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीवरून इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली. तो फिजी येथे सापडल्यानंतर तेथील प्रशासनाने त्याला ताब्यात घेतले आणि 30 जुलै रोजी त्याला भारतात आणण्यात आले.
फसवणूक झालेल्या लोकांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. एजंट आणि आरोपींच्या 115 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली असून ही मालमत्ता ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. याशिवाय, आणखी 60 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मालमत्ता जप्तीचा पुरवणी प्रस्तावही मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
आता रोडे यांच्या अटकेनंतर या आर्थिक साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे हे तपासातून उघड होईल, तसेच जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे कधी परत मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







