पुणे : जमिनीच्या वादातून व्यावसायिकाचा खून करण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. सहकार आयुक्त कार्यालयातील सुनावणी संपवून वकिलासोबत जात असलेल्या व्यावसायिकावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धारदार कटरने हल्ला केला होता. या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली असून, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आनंद बाबा गव्हाणे (वय १९, रा. गुलटेकडी) असे आहे. हल्ल्यात जीवन रंगराव सूर्यवंशी (वय ५५, रा. धाराशिव) हे गंभीर जखमी झाले होते.
ही घटना २२ सप्टेंबर रोजी घडली. जीवन सूर्यवंशी हे सहकार आयुक्त कार्यालयातील सुनावणी संपल्यानंतर आपल्या वकिलासोबत ससून रुग्णालयाच्या दिशेने जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांना गाठले आणि धारदार कटरने चेहऱ्यावर वार केले. या हल्ल्यात सूर्यवंशी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बंडगार्डन पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासोबतच संशयितांच्या मोबाईलशी संबंधित तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांचा माग काढला. त्यानंतर आनंद गव्हाणे याला अटक करण्यात आली, तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या चौकशीत अटक आरोपीने प्रवीण बाळाजी सूर्यवंशी (रा. बाभूळगाव, ता. उमरगा) याचे नाव सांगितल्याची माहिती आहे. प्रवीण सूर्यवंशी आणि जखमी जीवन सूर्यवंशी यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. या वादातून जीवन सूर्यवंशी यांचा खून करण्यासाठी हल्लेखोरांना धारदार कटर उपलब्ध करून देण्यात आला आणि ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप आहे. हा तपशील आरोपीच्या कथित कबुलीजबाबातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी हल्ल्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार प्रवीण सूर्यवंशी याचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे आणि गुन्हे निरीक्षक विनोद सलगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई केली.






