बारामती : मित्राला रुग्णालयात भेटण्यासाठी गेल्याच्या रागातून पाच जणांनी तरुणाच्या घरासमोर येऊन कोयता, चाकू आणि उसाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील दिपनगर परिसरात घडली. या हल्ल्यात अनिल संजय बनसोडे (वय 30) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांच्या पत्नीला देखील मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या वेळी आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे.

पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, गावातील सागर मदने याचे शुभम संतोष करे आणि ओम संतोष करे यांच्याशी मागील आठवड्यात भांडण झाले होते. या भांडणात सागर मदने याला मारहाण झाल्याने तो रुग्णालयात दाखल होता. 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अनिल बनसोडे हे सागरला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी शुभम आणि ओम करे यांनी त्यांना पाहिले होते.

त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास शुभम संतोष करे, ओम संतोष करे आणि अजिंक्य राजाराम पांढरे हे कोयते घेऊन, शंभू वणवे हा उसाचा तुकडा घेऊन, तर शंभू जराड हा चाकू घेऊन बनसोडे यांच्या घरासमोर आले. सागर मदने याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांना आमची नावे सांगतोस का, असा जाब विचारत त्यांनी बनसोडे यांना जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप आहे.

यावेळी बनसोडे यांच्या पत्नी शैला यांनी आरोपींना भांडण करू नका, असे सांगितले असता ओम करे याने त्यांना चापट मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर शुभम करे, ओम करे आणि अजिंक्य पांढरे यांनी कोयत्याने बनसोडे यांच्या डोक्यावर वार केले. बचावासाठी त्यांनी हात डोक्यावर घेतला असता उजव्या हाताच्या करंगळीजवळही दुखापत झाली. ते खाली पडल्यानंतर शंभू जराड याने चाकूने त्यांच्या डोक्यावर वार केला, तर शंभू वणवे याने उसाने हातावर आणि पाठीवर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाल्यानंतर आरोपी मोटारसायकलीवरून घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणी अनिल बनसोडे यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.







