लोणी काळभोर : भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व, गोसंवर्धनाची गरज आणि पशुप्रेमाचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने लोणी काळभोर येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये गोसंवर्धन अभियानांतर्गत गोपूजन सोहळा उत्साहात पार पडला. पारंपरिक पूजनासोबतच गायींचे दूध काढण्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आल्याने हा उपक्रम विशेष ठरला.

या वेळी शाळेचे अध्यक्ष नितीन काळभोर, सचिव मंदाकिनी काळभोर, सीईओ प्रथमेश काळभोर, प्राचार्या मीनल बंडगर, उपप्राचार्य प्रशांत लाव्हरे आणि सुपरवायझर पायल बोळे यांच्या हस्ते केसरी, गंगा, वृंदा आणि रॉलेक्स या गायींचे विधिवत पूजन करण्यात आले. इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी निधी राठोड हिने गोसंवर्धन अभियानाची माहिती देताना गोमातेचे महत्त्व, दुधाचे पोषणमूल्य तसेच दुधापासून तयार होणारे विविध पदार्थ आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे याविषयी मार्गदर्शन केले.

गायींचे संरक्षण, गोसंवर्धन आणि जनजागृतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याचे आवाहनही तिने केले. दुधातील भेसळ रोखण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी केलेल्या प्रयत्नांचाही तिने उल्लेख केला. अध्यक्ष नितीन काळभोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दूध हे शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्यांना गायीचे दूध कसे काढले जाते, याची प्रत्यक्ष माहिती व अनुभव मिळाला.

दरम्यान, गोसंवर्धन, पशुसंरक्षण आणि पशुप्रेमाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पशुप्रेम, जीवसृष्टीविषयी आदर आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऋतुजा देशमुख यांनी केले. ज्ञानासोबत संस्कार आणि शिक्षणासोबत प्रत्यक्ष अनुभव देण्याच्या शाळेच्या दृष्टिकोनाचे दर्शन या गोपूजन सोहळ्यातून घडले






