पुणे : पुणे-सोलापूर या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होऊन 12 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, यवत आणि केडगाव-चौफुला यांसारख्या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणांवर अद्याप एक साधे बसथांबा शेड देखील उभारण्यात आले नाही. सावली देणारी जुनी मोठी झाडे महामार्गाच्या चौपदरीकरणात तोडली गेल्याने, आता प्रवाशांना रणरणत्या उन्हात रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागत आहे.

एसटी बस सेवा रस्त्यावरून न जाता थेट मुख्य महामार्गावरूनच धावतात. त्यामुळे बस पकडण्यासाठी नागरिक व विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावरच थांबणे भाग पडते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन भीषण अपघातांचा धोका वाढला आहे. स्थानिक प्रशासन, महामार्ग प्राधिकरण आणि एसटी महामंडळ यांच्यातील उदासीनतेमुळे ही बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

यवत परिसरातील खुटबाब, भांडगाव, उंडवडी आणि माळशिरस आदी तर चौफुला येथून सुपे, केडगाव व बोरीपार्धी भागातील नागरिक.नोकरी, व्यवसाय आणि वैद्यकीय कामांसाठी पुणे शहरात जात असतात यात शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा, महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा अधिक समावेश आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, निवारा नसल्यामुळे या सर्वांना हवामानाचा मोठा फटका बसतो.

दरम्यान एवढा मोठा काळ उलटूनही मूलभूत सुविधा न मिळाल्यामुळे नागरिक आणि मतदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अपघात टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना तातडीने निवारा शेड उभारावेत, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थ व नियमित प्रवाशांकडून केली जात आहे.






