बारामती, ता. 23 : राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावरील जीवघेण्या हल्ला प्रकरणाने आता नाट्यमय वळण घेतले आहे. ज्या मित्रांवर राणा सूर्यवंशी विश्वास ठेवत होते, त्यांच्याच भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राणा यांच्यावर हल्ला घडवून आणण्यासाठी त्यांच्या तीन जवळच्या मित्रांनी मारेकऱ्यांना दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचा संशय पोलिसांना असून, या दिशेने तपास सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हल्ल्यानंतर राणा यांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयापर्यंत त्यांच्या सोबत असलेल्या या मित्रांच्या हालचालीही पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.

दौंडच्या ढाब्यावर दोन लाखांची सुपारी?
पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशाल धुमाळ, सागर पवार आणि रोहित तुपे या तिघांनी स्वप्निल कांबळे आणि निनाद महाडिक यांची दौंडजवळील एका ढाब्यावर भेट घेतल्याचा संशय आहे. याच ठिकाणी राणा सूर्यवंशी यांना संपवण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या तिघांकडे असलेली ‘डिफेंडर’ गाडी हल्ल्याच्या दिवशीही राणा सूर्यवंशी यांच्यासोबत होती. हल्ल्यानंतर त्यांना बारामतीतील रुग्णालयात नेण्यासाठीही याच गाडीचा वापर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातही हे तिघे राणा यांच्यासोबत उपस्थित होते.

सोशल मीडियावर या तिघांचे राणा सूर्यवंशी यांच्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जवळच्या मित्रांवरच संशयाची सुई वळल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. ढाब्यावर नेमकी कोणती चर्चा झाली, हल्लेखोरांशी या तिघांचा काय संबंध होता आणि एकाच गाडीची विविध ठिकाणी उपस्थिती का आढळली, या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत पाच जणांना अटक
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. त्यामध्ये राणा सूर्यवंशी यांचा चालक ज्ञानेश्वर शिंदे याचाही समावेश आहे. शिंदे याने स्वप्निल कांबळे याला सुपारी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर स्वप्निलने ही सुपारी एका १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाला आणि पार्थ अवथळे याला दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, निनाद महाडिक याने हल्ल्यासाठी दुचाकी उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर संशयितांची भूमिका शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
‘वाय’ दर्जाची सुरक्षा दहा किलोमीटर आधीच मागे
राणा सूर्यवंशी यांना शासनाकडून ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली असल्याची माहिती आहे. मात्र, हल्ल्याच्या दिवशी त्यांनी घटनास्थळापासून सुमारे दहा किलोमीटर आधीच सुरक्षारक्षकांना थांबण्यास सांगितल्याचे समोर आले आहे. जमिनीची पाहणी करायची असून एका व्यवहारासंदर्भात चर्चा करायची असल्याचे कारण त्यांनी दिल्याची माहिती आहे. यावेळी त्यांच्यासोबत एक पोलीस जवान उपस्थित होता. मात्र, हल्ल्यानंतर आरोपींनी संबंधित जवानाच्या हाताला चावा घेऊन घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद असल्याचे सांगितले जाते. सुरक्षा व्यवस्था मागे ठेवण्यामागील परिस्थिती आणि या निर्णयाचा हल्ल्याशी काही संबंध होता का, याचाही तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
‘आम्ही तुमचे फॅन आहोत’ म्हणत जवळ आले अन् हल्ला केला
मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बारामती विमानतळाजवळ राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. सीसीटीव्ही फुटेज आणि तपासातील माहितीनुसार, पार्थ अवथळे आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने प्रत्यक्ष हल्ला केल्याचा आरोप आहे. ‘आम्ही तुमचे फॅन आहोत,’ असे सांगत हे दोघे राणा यांच्या जवळ गेले. त्यानंतर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सत्तूराने त्यांच्या हातावर वार केल्याची माहिती समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेज, आरोपींची चौकशी आणि संशयितांच्या हालचालींमुळे या प्रकरणात नवनवीन बाबी समोर येत आहेत. हल्ल्यामागे नेमके वैयक्तिक वैमनस्य, आर्थिक व्यवहार की अन्य कोणते कारण आहे, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.
दरम्यान, जिवाभावाच्या मैत्रीच्या आड कट रचला गेला होता का? या प्रश्नाचे उत्तर आता पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची अंतिम सत्यता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच निश्चित होणार आहे.






