पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्याप्रकरणाचा (Murder Case) निकाल उद्या शुक्रवारी (ता. १०) रोजी लागणार आहे. खुनाचा तपास पूर्ण होऊन पुण्यातील विशेष न्यायालयाने 5 आरोपीविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरवात झाली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला. या घटनेने अवघे राज्य हादरले. सुरुवातील पुणे पोलिस, त्यानंतर एसटीएस आणि अखेर केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) या सर्व हत्या प्रकरणांचा तपास केला.
दाभोलकरांच्या खुनानंतर तब्बल दहा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागत असल्याने याकडे राज्यासह देशाचे लक्ष आहे. खुनाचा तपास पूर्ण होऊन पुण्यातील विशेष न्यायालयाने पाच आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरवात झाली आहे. जवळपास अडीच वर्षापासून हा खटला सुरु होता.
या गुन्ह्यातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर १५ सप्टेंबर २०२१ ला आरोप निश्चित करण्यात आले. सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरु होती. त्यानंतर न्यायाधीश नावंदर यांची बदली झाल्याने सध्या पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात २० साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळंिसगीकर, अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अॅड. सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले. त्यांनी दोन साक्षीदार न्यायालयात हजर केले होते. आता या खटल्याचे कामकाज पूर्ण झाले असून उद्या शुक्रवारी (ता.१० मे) रोजी दाभोलकर खटल्याचा निकाल लागणार आहे.