बारामती: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि काही सेकंदांत हजारो लाईक्स मिळवण्याच्या नादात तरुणांकडून धोकादायक प्रकार केले जात असल्याचे अनेकदा समोर येते. बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथेही असाच प्रकार घडला. हातात पिस्तूल घेऊन रील तयार करून सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रेम प्रताप जगताप या तरुणाला सुपा पोलिसांनी अटक केली आहे.

प्रेम जगताप याने हातात पिस्तूलासारखे घातक शस्त्र घेऊन रील तयार केली होती. त्यानंतर त्याने ही रील सोशल मीडियावर प्रसारित केली. काही काळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याची माहिती सुपा पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रेम जगतापला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

सध्या सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्या रील्सवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. तरुणांनी केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. काही सेकंदांची प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्नात केलेली चूक भविष्यात गंभीर कायदेशीर परिणामांना कारणीभूत ठरू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत निर्माण करणारे व्हिडिओ तयार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. सोशल मीडियावर अशा प्रकारची रील तयार करून ती प्रसारित केल्यास संबंधितांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे सुपा पोलिसांनी स्पष्ट केले.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रेम जगतापविरोधात कारवाई केली.
या कारवाईमुळे सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे. सोशल मीडियावरील काही सेकंदांची प्रसिद्धी कायदेशीर अडचणीत बदलू नये, यासाठी अशा धोकादायक प्रकारांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







