लोणी काळभोर, ता.26 : विशे कॉम्पोनंटस् इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कडून पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील ७०० विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. यावेळी आपण ज्या समाजात रहातो. त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. ‘आहे रे’ वर्गातील नागरिकांनी ‘नाही रे’ वर्गातील आपल्या बांधवासाठी उत्पन्नातून ठराविक रकम खर्च केली पाहिजे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण सुसह्य व्हावे. या हेतूने लोणी काळभोर (ता.हवेली) येथील विशे कॉम्पोनंटस् इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) गेली दहा वर्ष विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. असे प्रतिपादन कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रमोद होरे यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विशे कॉम्पोनंटस् इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कडून पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील ७०० विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमोद होरे बोलत होते. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनंत कृष्णन, मानव संसाधन विभागाचे संचालक नथानियल मणिक्कम, कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन काळभोर, विद्यालयाचे प्राचार्य सिताराम गवळी, शर्मिला साळुंखे, शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य सिताराम गवळी म्हणाले, शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाची गरज ओळखून लोणी काळभोर मधील ग्रामस्थांच्या मदतीने शाळेची उभारणी केली. वीस पंचवीस विद्यार्थ्यांवर सुरु झालेली शाळा आज मोठा वटवृक्ष झालेली आहे. शैक्षणिक गरज म्हणून विशे कंपनीने इयत्ता पाचवी ते सातवीमधील सर्व विद्याथ्यांना दप्तर दिले आहे. आता विद्याथ्यांनी भरपूर अभ्यास करून प्रगती साधायची आहे.
दरम्यान, कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन काळभोर यांचे शिक्षण पाचवी ते बारावी व पुढे महाविद्यालयीन याच शाळेत झाले असल्यामुळे त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तर या कार्यक्रमाचे आभार शाळेच्या जेष्ठ शिक्षिका शर्मिला साळुंखे यांनी मानले.