पिंपरी : खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथे दिव्यांग मुलाने वडिलांच्या डोक्यात अवजड वस्तू मारून खून केल्याची धक्कादायक घटना ३० नोव्हेंबर रोजी घडली. खंडू लांडे (रा. दौंडकरवाडी, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी खंडू यांचा मोठा मुलगा बाबाजी खंडू लांडे (वय ३५) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खंडू यांचा लहान मुलगा नितीन खंडू लांडे (वय ३२) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, वडिलांसोबत भांडण झाल्याने नितीन लांडे याने त्यांच्या डोक्यात अवजड वस्तूने मारून त्यांना गंभीर जखमी केले. हा प्रकार फिर्यादी यांच्या चुलत भावाने पाहिला आणि त्याबाबत फिर्यादींना फोनवरून माहिती दिली. खंडू यांना चाकण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारांदरम्यान गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास खंडू यांचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपी मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितलं असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.