गणेश सुळ
इंदापूर : धनगर समाजाला एनटी प्रवर्गातून एसटी प्रवर्गामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर बेमुदत उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शनिवारी इंदापूर बंदची हाक देण्यात आली होती. इंदापूरमध्ये 100 टक्के प्रतिसाद मिळाला, तर पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोलनाक्यावर रास्ता रोको करण्यात आला.
धनगर समाजाला एनटी प्रवर्गातून एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे, राज्य सरकारने तातडीने आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर चंद्रकांत वाघमोडे हे मागील 10 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.
चंद्रकांत वाघमोडे यांचा उपोषणाचा आजचा अकरावा दिवस असून सरकारने धनगर समाजाच्या उपोषणाकडे लक्ष न दिल्याने धनगर समाज आक्रमक झाला आहे. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी इंदापूर, बारामती, काटेवाडी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
या वेळी छोटे- मोठे व्यावसायिक यांनी आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवून या मागणीला पाठिंबा दर्शविला. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी या निवस्थानासमोर ठिय्या आंदोलन करत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.