इंदापूर, (पुणे) : मोठे व दीर्घकालीन प्रश्न सोडवायचे असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून मतदान करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. इंदापूर येथील वाघ पॅलेसमध्ये व्यापारी व वकिलांच्या संयुक्त बैठक आज बुधवारी १७ एप्रिल पार पडली. यावेळी अजित पवार बोलत होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले, इंदापूर तालुक्यात नव्या योजना आणण्यात येतील. शहरातील रखडलेली कामे लवकरच मार्गी लागतील. न्यायालयाच्या इमारतीच्या परिसरात नवीन सुधारणा करण्यात येतील. मुख्यबाजार पेठेमधील रस्ता रुंदीकरण, अतिक्रमणे व विविध विकासाचे विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील. तसेच लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर दर महिन्याला प्रशासनाची बैठक लावून सामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम सुरु करण्यात येईल, असं आश्वासन अजित पवारांनी यावेळी इंदापूरकरांना दिलं.
पण आमच्यासाठी मशीनचे बटण दाबा : अजित पवार
पुढे म्हणाले, पाहिजे तेवढा निधी देईन, निधी द्यायला आम्ही सहकार्य करु पण आमच्यासाठी मशीनचे बटण दाबा, म्हणजे मला ही निधी द्यायला बर वाटेल, नाहीतर माझा हात आखडता येईल’ असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. तसेच ७ मे रोजी पाच वाजल्यानंतर जो तुम्हाला ओळखेल, तुमचे कामे मार्गी लावेल, तुमच्या समस्या सोडवेल, विकासाचे धोरण उभे करेल, तालुक्यात विविध नवनवीन संकल्पना आणण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या संकटात तालुक्यासोबत उभा राहील अशाच उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन पवार यांनी केले.
सुनेत्रा पवार तुम्हाला बाहेरचे वाटणार नाहीत
खासदारांनी आपल्या कामात ढवळाढवळ करु नये अशीच आमदारांची वा आमदार होऊ इच्छिणारांची अपेक्षा असते. मला जो काही चाळीस वर्षांचा अनुभव आहे तो बघता आमचा जो उमेदवार आहे, तो योग्य पध्दतीने काम करेल. कामात ढवळाढवळ करतील असे वाटत नाही.
ते तुम्हाला बाहेरचे वाटणार नाहीत घरचे वाटतील, या शब्दात अजित पवार यांनी महायुतीच्या उमेदवार सूनेत्रा पवार यांची भलावण करत, शरद पवार यांच्या ‘त्या’ विधानाचा समाचार घेतला. तर गेल्या दहा वर्षांत सत्तेवर असणाऱ्यांनी सतत पंतप्रधानांवर टीका केली. त्यामुळे केंद्रातील कोणतेही काम बारामती लोकसभा मतदारसंघात, इंदापूर विधानसभा मतदार संघात आले नाही, असं सांगत खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांनी टोला लगावला.