दीपक खिलारे
इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातच संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. त्याच अनुषंगाने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबाच्या भेटीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार हे दोघे शुक्रवार (दि.१९) येणार आहेत. ही भेट इंदापूरमधील भाग्यश्री बंगलो या ठिकाणी होणार आहे.
जर बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जिंकायची असेल व इंदापूर विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य घ्यायचे तर हर्षवर्धन पाटील यांना सोबत घेतल्याशिवाय कोणालाही पर्याय नाही. मात्र, सध्या हर्षवर्धन पाटील हे भाजपचे नेते आहेत आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट हा भाजपसोबत राज्यामध्ये सत्तेत आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला आहे. मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होत आहे. हा सामना अतिशय अटीतटीचा आणि दोन्ही गटाच्या प्रतिष्ठेचा झाला आहे.
दोन दिवसात इंदापूर तालुक्यात या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावत आपापल्या पद्धतीने ताकद दाखवली आहे. मात्र, या दोन्ही कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांनी प्रकर्षाने पाठ फिरवली आहे. मात्र, अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांच्या कौटुंबिक भेटीनंतर दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्ते अधिक ताकतीने बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागतील, असे बोलले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी होणारी पाटील आणि पवार यांच्या कौटुंबिक भेट इंदापूर तालुक्यात सुनेत्रा पवार यांच्यासाठी फायद्याची ठरू शकते.