संदिप टूले
केडगाव : दौंड येथील कत्तलखाना रद्द करण्यासाठी बंडातात्या कराडकर हे आंदोलनाच्या पवित्र्यात होते. या कत्तलखान्यामुळे भीमा आणि इंद्रायणी नदी अपवित्र होईल, असे वारकऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे वारकऱ्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन शासनाने हा कत्तलखाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दौंड तालुक्यातील तसेच पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा व सोलापुर जिल्ह्यातील तमाम हिंदू धर्मियांची तीर्थक्षेत्र असलेल्या भीमा नदी, चंद्रभागा नदीवर व श्री क्षेत्र सिद्धटेक गणपती मंदिराच्या जवळ सर्वात मोठा शासकीय यांत्रिक कत्तलखाना मंजूर करण्यात आला होता. या कत्तलखान्यास हिंदू धर्मियांचा तसेच जैन, शिख, बौद्ध व वारकरी संप्रदायचा कडाडून विरोध होता.
दरम्यान, दौंड शहर आणि आसपास राहणाऱ्या नागरिकांना त्यांची मते मागितली नव्हती. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांची मते किंवा हरकती मागितल्या नसल्यामुळे आणि पर्यावरणाच्या दुष्टीने हा कत्तलखाना घातक असल्यामुळे दौंडकरांचा याला मोठा विरोध होता. एवढंच नाही तर पंढरपूरला जाणारी चंद्रभागा नदीजवळ हा कत्तलखाना असल्यामुळे त्यातील दूषित रक्ताचे पाणी नदीत सोडले जाईल.
त्यामुळे चंद्रभागेची विटंबना होईल. या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाने याला प्रखर विरोध केला होता. तसेच हा कत्तलखाना तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी हिंदू समाज याविरोधात मोठे जनआंदोलन उभे करून रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत होते. मात्र, त्याआधीच शासनाने कत्तलखान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील हिंदू समाज व संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले.