पुणे : दौंड तालुक्यातील (Daund News) कुरकुंभ एमआयडीसी (Kurkumbh MIDC) परिसरातील मेलझर केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुरुवारी (दि. 16) दुपारी झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. भिंत बांधकामादरम्यान निष्काळजीपणाने काम केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या गंभीर घटनेनंतर जवळपास ८ तासांनी एफआयआर दाखल करण्यात आला, त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ही घटना 16 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी सुमारे 4.30 वाजता घडली. कुरकुंभ एमआयडीसीतील मेलझर केमिकल प्रा. लि. या कंपनीच्या परिसरात सुरक्षा भिंतीचे बांधकाम सुरू होते. त्या दरम्यान, भिंतीच्या बाहेरच्या बाजूने जेसीबीद्वारे मातीची भर टाकण्याचे काम सुरू असताना ओल्या भिंतीवर अतिरिक्त दबाव आला आणि भिंत अचानक कोसळली. भिंतीखाली तीन महिला कामगार अडकल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले आणि दौंड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, दोन महिलांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

मृत महिलांची नावे ममतादेवी सुदामा दास (वय 27, रा. पांढरेवाडी, दौंड, मूळ रा. बिहार) आणि सोनीदेवी सरयु कुमार (वय 28, रा. पांढरेवाडी, दौंड, मूळ रा. बिहार) अशी आहेत. तर जखमी महिला गीतादेवी बाबूलाल कोल (रा. पांढरेवाडी, मूळ रा. मध्य प्रदेश) अशी आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार संजय धनीराम नगरे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टर जयकुमार रामचंद्र मुंडफणे (वय 46, रा. मांजरी ग्रीन्स, पुणे) आणि सुपरवायझर अक्षय भानुदास मोरे (वय 28, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम 105, 125, 125(a), 125(b) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तपासात असे समोर आले की, दोन्ही आरोपींनी भिंतीचे बांधकाम ओले असतानाही बाहेरील बाजूने मातीची भर टाकण्याचे काम सुरू ठेवले. यामुळे भिंतीवर मातीचा दबाव वाढून ती कोसळली. या निष्काळजीपणामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिद्री करत आहेत.







