संदीप टूले
केडगाव, (पुणे) : मलठण (ता.दौंड) येथे धनगर समाज बांधवांनी आज 200 मेंढरे घेऊन विविध पक्षांच्या नेत्यांसह महाराष्ट्र सरकारविरोधात निषेध मोर्चा काढून चौंडी येथील उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवला. अहिल्यादेवी होळकर चौक येथे सर्व धनगर बांधव एकत्र येऊन मोर्चाला सुरूवात झाली.
धनगर समाजाचा हा निषेध मोर्चा मारुती मंदिर ते ग्रामपंचायत ऑफिसजवळून मलठण गावच्या मुख्य भागातून ‘आरक्षण आमचं हक्काचं, नाही कोणाच्या बापचं’, ‘कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, अशा जोरदार घोषणाबाजी करत काळ्या फिती लावून अहिल्यादेवी होळकर चौकात निषेध मोर्चाची सांगता झाली.
दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये आता वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून पुढील आठवड्यात दौंडसह शिरूर, इंदापूर, बारामती धनगर एकत्रित येऊन सरकारच्या विरोधात मोर्चाचे आयोजन करणार आहोत, असे पांडुरंग मेरगळ यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे किरण वाघमोडे, माजी सरपंच नवनाथ थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच हनमंत कोपनर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे किरण वाघमोडे, प्रसिद्ध युवा उद्योजक लाला आमनर, दौंड पंचायत समितीचे माजी सदस्य घनश्याम देवकाते, माजी सरपंच नवनाथ थोरात, विकास सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब देवकाते, माजी उपसरपंच नवनाथ वाघमोडे, उपसरपंच गणेश देवकाते, दौंड मार्केट कमिटीचे माजी चेअरमन माऊली चव्हाण, गणेश शेंडगे, अनिल आमनर, प्रदिप देवकाते, शहाजी वाघमोडे इत्यादींसह मोर्चामध्ये मोठ्या संख्येने धनगर समाजातील बांधव सहभागी झाले होते.